Visitors: 228084
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

कल्याण पूर्व वसार, आडवली-ढोकळी येथील बेकायदा इमारती, चाळी भुईसपाट; आय प्रभागाची तोडकाम मोहीम

  team jeevandeep      05/03/2025      mahatvachya-batmya    Share


कल्याण :

कल्याण पूर्व आय प्रभागातील बेकायदा इमारती, बेकायदा चाळी तोडण्याची मोहीम शुक्रवारपासून आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सुरू केली आहे. मागील दोन दिवसात आडिवली ढोकळी येथे दोन विकासकांच्या बेकायदा इमारती, वसार गाव येथे ३२ खोल्यांच्या चाळी, जोते तोडकाम पथकाने भुईसपाट केले. याशिवाय तीन भूमाफियांवर बेकायदा बांधकामप्रकरणी एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी रहिवास मुक्त असलेल्या बेकायदा इमारती प्राधान्याने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिेले आहेत. आय प्रभागातील रहिवास मुक्त बेकायदा इमारती तोडण्याची मोहीम साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आयुक्त डाॅ. जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात सुरू केली आहे.

ढोकळी गाव येथे कोहिनूर रस्त्यावर ओम साई डेव्हलपर्सचे संजय शेळके यांंनी तीन माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती. ही इमारत अनधिकृत असल्याने पथकाने जमीनदोस्त केली. ढोकळी गाव येथे जावेद शेख यांची बेकायदा इमारत भुईसपाट करण्यात आली. वसार येथे दहा चाळींची बेकायदा बांधकामे, नवीन चाळींची उभारणी करण्यासाठी दहा जोते बांधले होते. ही बांधकामे तोडण्यात आली. या कारवाईने भूमाफियांची दाणादाण उडाली आहे.

विकासकावर गुन्हा

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे जमीन मालक बाळाराम काळू म्हात्रे, मे. राम डेव्हलपर्सतर्फे भागीदार शिवकुमार राममिलन मिश्रा, सागर राममिलन मिश्रा यांनी साई छाया या बेकायदा आठ माळ्याच्या इमारतीची उभारणी केली आहे. या इमारत प्रकरणी पालिकेने विकासक, जमीन मालकांना या बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली होती. या इमारतीचे अध्यक्ष, सचिव नोटिसीनंतर सुनावणीला हजर होते. जमीन मालक विकासक सुनावणीला हजर झाले नाहीत. आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त पवार यांनी हे बांधकाम अनधिकृत घोषित केले. अधीक्षक शंकर जाधव यांनी बेकायदा इमारत प्रकरणी जमीन मालक, विकासकांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला आहे.

बेसुमार कुपनलिका

आय प्रभाग हद्दीतील वसार, ढोकळी, आडिवली, भाल परिसरात बेकायदा इमारती, चाळींच्या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी भूमाफियांनी एकेका ठिकाणी ३० ते ४० कुपनलिका खोदून ठेवल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. या भागातील बेकायदा बांधकामांना महावितरणाचा चोरून वीज पुरवठा घेण्यात आला होता. या चोरीच्या वीज चोरीप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवुनही ते दखल घेत नसल्याची माहिती आहे.

आय प्रभागातील बेकायदा इमारती, बेकायदा चाळी, निर्माणाधीन कामे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वसार, आडिवली, ढोकळी भागात कारवाई केली जात आहे. इतर भागातील बेकायदा बांधकामे या मोहिमेत जमीनदोस्त केली जाणार आहेत. विकासक, जमीन मालकांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग.

+