Team jeevandeep 01/05/2025 mahatvachya-batmya Share
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे प्रकाशन
कल्याण : महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी केडीएमसी आयुक्तांनी व्यक्त केली.
देशातील पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून अधिकाधिक स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशातील अधिकाधिक लोकांनी आपल्या घराच्या किंवा गृहनिर्माण सोसायट्यांच्या छतावर हा सौर ऊर्जाप्रकल्प उभारण्यासाठी केंद्र, राज्य आणि त्यापाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
या पंतप्रधान मोफत सूर्यघर वीज योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून पंतप्रधान मोफत सूर्यघर योजनेचे एक माहितीपत्रक बनवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या सूर्यघर योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम काय, कोण कोण लाभ घेऊ शकते, कोणाला किती अनुदान मिळेल, बँकेकडून यासाठी किती अर्थसहाय्य केले जाते, त्याची नोंदणी प्रक्रिया काय आहे या सर्व मुद्द्यांची सखोल माहिती या पत्रकात देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
तर या योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवलीतील अधिकाधिक लोकांनी आणि गृहसंकुल सोसायट्यांनी रूफटॉप सोलर योजना राबवावी. ज्यामुळे देशातील सौर ऊर्जेमध्ये वाढ होईल आणि हळूहळू आपण क्लीन एनर्जी दिशेने पाऊल टाकू हा त्याचा मुख्य उद्देश असल्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले. कल्याण डोंबिवली शहरात विशेष करून ज्या रहिवासी सोसायट्यांनी आतापर्यंत सोलर लावले नसतील अशा गृहनिर्माण सोसायट्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्युत विभागातर्फे विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीतील अशा इमारतींचे सर्वेक्षणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून कल्याण डोंबिवली शहर क्लीन एनर्जी आणि क्लीन आणि क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये पुढाकार घेईल असा विश्वासही आयुक्त गोयल यांनी व्यक्त केला.