Visitors: 228623
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक

  TEAM JEEVANDEEP      28/01/2025      mahatvachya-batmya    Share


मुंबई : राज्यातील दूध उत्पादनामध्ये वाढ होत असून दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधातील मोहीम तीव्र केली असून या कारवाईअंतर्गत राज्यात एका दिवसांमध्ये १ हजार ६७ दुधाचे नमुने घेण्यात आले असून, यांचा अहवाल येताच संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये दूध संकलनाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये प्रतिदिन १ कोटी ७१ लाख १८ हजार इतके विक्रमी दूध संकलन करण्यात आले होते. राज्यामध्ये एकीकडे दूध उत्पादन वाढत असताना दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने दूध विक्रेते, वितरक, डेअरी, दूध संकलन केंद्र येथील पिशवी बंद व सुट्या दुधांचे नमूने घेण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमानुसार संपूर्ण राज्यात १०० दिवसांमध्ये पाच हजार दुधाचे नमूने घेण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात नुकतीच अन्न आणि औषध प्रशासनाने अचानक केलेल्या कारवाईमध्ये १ हजार ६७ दुधाचे नमूने घेण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पिशवी बंद आणि नामांकित कंपन्यांच्या दुधाचे ६८१ नमूने, तर सुट्या दुधाचे ३८६ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे, कमी प्रतीचे दूध असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्याने दिली.

खासगी प्रयोगशाळांबरोबर करार

दुधाचे नमुने घेतल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल येण्यास विलंब हाेत असल्याने दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडथळे येतात. त्यामुळे दुधाच्या नमुन्यांचा अहवाल जलदगतीने मिळावा यासाठी खासगी प्रयोगशाळांबरोबर करार करण्यात आला आहे. त्यामुळे या नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यास मदत होणार आहे.

दुधात कशाची भेसळ करतात?

नागरिकांना चांगल्या दर्जाचे दूध मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून वारंवार कारवाई करण्यात येते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात येते. तरीही अधिक नफा मिळविण्याच्या हेतूने दुधात भेसळ करण्याचे प्रमाण वाढत आहे. दुधामध्ये युरिया आणि चुना मिसळल्यास ते पटकन लक्षात येते. याउलट त्यामध्ये पामतेल व दूध पावडर मिसळल्यास भेसळ झाल्याचे सहज लक्षात येत नाही. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची दिशाभूल करणे शक्य होते.

+