Visitors: 390123
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती

  - डॉ.आनंदराव सूर्यवंशी      28/05/2025      lekh    Share


Vinayak_Damodar_Savarkar_image 

(२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६)

    थोर देशभक्त, प्रखर हिंदु राष्ट्रवादाचा जनक, बुद्धीवादी नेता ,महान क्रांतिकारक,  प्रतिभावंत कवी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883रोजी  नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. वासुदेव बळवंत फडके यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकर यांचा जन्म झाला.

विनायक दहा वर्षाचा असताना त्यांच्या आई राधाबाई यांचे निधन झाले . विनायकाला गणेश(बाबाराव ) माई व नारायण अशी भावंडे होती. ते घरातील दुर्गा देवीची पूजा करीत असत. त्याचबरोबर रामायण, महाभारत, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांच्या कथा ते वाचत. त्यांच्या बालमनावर अनेक चांगले संस्कार घरातील वातावरणात होत होते. लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद लागलेला होता. विनायकरावांचे प्राथमिक शिक्षण भगूरच्या शाळेत झाले. त्यांची स्मरणशक्ती फारच चांगली होती. त्यांना वाचनाची खूपच गोडी होती. ऐतिहासिक ,धार्मिक तत्त्वज्ञान या विषयावरची पुस्तके ते वाचित असत. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना नाशिकला पाठवले .शिवाजी हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला .त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर हेही तेथेच होते. त्यांनी 'अभिनव भारत' या नवीन संस्थेची स्थापना केली. एवढा व्याप करून देखील ते बी. ए .ची परीक्षा उत्तीर्ण झाले .आणि पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला.  ते मुंबईला आले आणि पुढे ते युवकांचे नेते बनले. अधिक चांगले शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.  क्रांतिकार्य करून सुद्धा ते बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. पण त्यांना सनद देण्यास न्यायमंडळाने नकार दिला. देशप्रेमापुढे सावरकरांना बॅरिस्टरीच्या संधीचे महत्त्व अजिबात वाटत नव्हते. सावरकर लंडनमध्ये राहून क्रांतिकारकांना निरनिराळी मदत करीत होते .त्यामुळे भारतात क्रांतिकार्यास जोराने सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत होते  इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले होत होते  महाराष्ट्र आणि बंगाल या प्रांतात क्रांतिकारकांनी अनेक प्रकारे इंग्रज सरकारला आव्हान निर्माण केले होते  त्यामुळे चिडून ब्रिटिश सरकारने अनेक क्रांतिकारकांना पकडून शिक्षा केल्या  मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा तरुण अनुयायी होता. धिंगरा हे राष्ट्रीय वृत्तीचे होते  सावरकरांनी त्यांना अभिनव भारताचे सभासद करून घेतले. धिगरांनी कर्झन  वायलीवर गोड्या झाडून त्याला ठार मारले . कर्झनला वाचविण्यासाठी धावून आलेला आणखी एक माणूसही ठार झाला होता. मदनलाल धिंग्रा यांना पकडण्यात आले. त्यांना फाशी देण्यात आले. सावरकरांनी 'डेली न्यूज'या वृत्तपत्रातून धिंग्रा या एक स्वातंत्र्यप्रेमी देशभक्ताविषयी जगजाहीर निवेदन दिले.त्यास स्वातंत्र्य प्रेमी हुतात्मा ठरविण्याचा सावरकरांचा हेतू त्यातून साध्य झाला. त्यामुळे सावरकरांच्या कुटुंबीयांचा भयंकर छळ सुरू झाला. बाबाराव सावरकरांना पकडून नेले  त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यामुळे भारतीय लोक फार चिडले.  इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष माजला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, भगतसिंग, खुदीराम बोस ,प्रफुल्ल चाकी असे हजारो क्रांतिकारक घडले. मॅझिनीचे चरित्र, 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकांनी व स्वा. सावरकरांच्या लेखांनी आणि त्यांच्या भाषणामुळे युवा पिढी क्रांतिकार्याकडे खेचली गेली. देशाच्या विविध भागात पुस्तकांमध्ये रिव्हाल्व्हर  पॅक करून त्याची पार्सलही पोहोचवली गेली .बॉम्बची कृती अनेक ठिकाणी पोहोचती करून बॉम्ब तयार केले गेले .आणि यासारख्या असंख्य क्रांतिकारी हालचाली मागे सावरकरांची प्रेरणा आणि सक्रिय सहभाग होता. त्यामुळे ब्रिटिश सरकार पार हादरून गेले होते.  देशांमध्ये अराजकता पसरविणे, प्रक्षोभक वक्तव्य करणे, लोकांना चिथवणे, ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध बंड करणे या आरोपाखाली वीर सावरकरांना अटक होऊन त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यांना इंग्लंडहून  सागर मार्गे मुंबई येथे नेताना एक जुलै 1910 रोजी त्याकाळी जगात गाजलेल्या सावरकरांच्या  मार्सेलिस बंदरातील उडीने इंग्रज सरकार पार हादरून गेले होते. वीर सावरकरांना अंदमानच्या काळकोठडीत  50 वर्ष जन्म ठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली . सावरकरांना अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा  भोगण्यासाठी पाठविले होते. अनेक हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या.  सावरकरांना जास्तीत जास्त त्रास देण्याचे कार्य तत्कालीनअंदमान कारागृहाचा अधिकारी बारी याला देण्यात आले होते.   सावरकरांना 'डी' म्हणजे डेंजरस कैद्याचा दर्जा दिला होता . त्यांना तेलाच्या घाण्यावरून दहा दहा तास कोलू (घाणा)चालवावा लागत असे. अंदमान येथील सात क्रमांकाच्या चाळीतील वरच्या मजल्यावरील कोठडीत सावरकर बंदिस्त झाले होते. एकांतवासात सावरकरांचे मन काव्यरचने कडे वळले. अंदमानचे सावरकरांनी अनुष्ठुप छंदाचा पुनरुद्धार केला .तुरुंगाच्या भिंती हे त्यांचे कागद बनले व घायपाताचा काटा ही त्यांची लेखणी झाली .भिंतीवर स्तंभ आखून लिहावयास त्यांनी सुरुवात केली. भीषण परिस्थितीत जन्मास आलेले सावरकरांचे 'कमला काव्य' म्हणजे मराठी भाषेचे एक दैदिप्यमान असे भूषण झाले  कमला काव्याची निर्मिती होत असतानाच सावरकरांची बदली दुसऱ्या एका खोलीत झाली आणि मूळच्या खोलीत प्रयाग येथील स्वराज्य पत्राचे संपादक रामहरी यांचे वास्तव्य सुरू झाले. त्यांनी सावरकरांच्या मदतीने भाषेचा अभ्यास केलेला होता. या खोलीत येताच भिंतीवर लिहिलेले काव्य रामहरी यांनी पाठ करून टाकले. सुदैव असे की रामहरी यांची सुटका अंदमानातून लवकरच झाली. ते जेव्हा कलकत्त्यात आले तेव्हा बॅरिस्टर सावरकरांनी त्यांची भेट घेतली .या भेटीमध्ये रामहरींनी कमला काव्याच्या शेकडो ओळी पाठ म्हणून दाखविल्या. सावरकरांनी एक प्रत त्यावरून तयार केली. दरम्यानच्या काळात 1921 मध्ये सावरकर तुरुंगातून सुटून रत्नागिरी येथे स्थानबद्ध झाले.

वीर सावरकर यांनी संन्यस्त खड् .ग, उ:शाप,उत्तर क्रिया अशी तीन नाटके लिहिली  'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र लिहिले आणि 'काळे पाणी' ही कादंबरी लिहिली  त्यांचे इतिहासाची सहा सोनेरी पाने l857 चे स्वातंत्र्यसमोर हे ग्रंथ देखील प्रसिद्ध आहेत .पुढे ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले 1938 च्या मुंबईच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तो दिवस सोन्याचा दिवस पाहण्याचे भाग्य सावरकरांना लाभले. आपणांस झालेले दुःख ते विसरून गेले  सावरकरांच्या साऱ्या अपेक्षा पूर्ण झाल्या  सर्व बांधवांबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी सहभोजन सुरू केले. भागोजी कीर यांच्याकडून पतित पावन मंदिर बांधून घेऊन ते अस्पृश्यांसाठी खुले केले . अपार कष्ट त्यांनी सोसले  ते आजारी पडले. भारत मातेचा हा सुपुत्र दिनांक 26 फेब्रुवारी 1966 रोजी चिरनिद्रेत लीन झाला .

अशाप्रकारे महान स्वातंत्र्यवीर मातृभूमीच्या कुशीत कायमचा विसावला .एक महाज्योत विझली. संपूर्ण देशावर शोक कळा पसरली ." माझ्या मृत्यूमुळे कुठलेही काम काज बंद ठेवू नका राष्ट्रीय उत्पादनात खंड पडू देऊ नका" असे त्यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले होते . किती हे महान विचार! सावरकरांचे सर्व जीवनच प्रेरणा देणारे होते  सावरकर म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या यज्ञातील एक महान ज्वाला! त्यांचे देशप्रेम, त्याग ,बलिदान, सहनशक्ती आणि अफाट साहस हे गुण भविष्यात आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मार्ग दाखवतील.त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान यावा. अशा या महान स्वातंत्र्य वीराला कोटी कोटी प्रणाम!

- डॉ.आनंदराव सूर्यवंशी

+