- डॉ आनंदराव सूर्यवंशी 11/06/2025 lekh Share
(२४ डिसेंबर १८९९- ११ जून १९५०)
"आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी तुरुंगात आहेत . तो राजबिंडा जवाहरलाल नेहरू तुरुंगात खितपत पडला आहे . ते मूठभर इंग्रज लोक सातासमुद्रापलीकडून आपल्या कोट्यावधी लोकांवर राज्य करीत आहेत .आपल्याच बेईमान लोकांच्या मार्फत , हा राजगाडा हाकीत आहेत . तुम्ही कसे हे सहन करता ? आपली लहान लहान मुलं फटके खात आहेत .अनेकांच्या घरादारांची राख रांगोळी झाली आहे . फासाच्या तख्तावर आपल्या असंख्य तरुणांच्या माना अडकल्या आहेत . . हे तुम्हाला कसं पाह वत ?तुम्ही असे षंडासारखे गप्प कसे ? आपण मेलेल्या आईचे दूध प्यालेले आहोत का ?शरम नाही वाटत तुम्हाला ! उठा, सत्याग्रहात भाग घ्या, जुलमी कायदे पायाखाली तुडवा . या इंग्रज सत्तेला सातासमुद्रापलीकडे घालवा आणि आपला भारत देश स्वतंत्र करा । हे इंग्रजांची बूट चाटणारे यमदूत मला पकडण्यासाठी आले आहेत . मी जरी पकडला गेलो तरी , माझ्या खान्देशाने मागे राहता कामा नये . शेकडोनी सत्याग्रह करा .तुरुंगात जा . इंग्रज सत्तेला सळो की पळो करून सोडा " ...
खान्देशातील अंमळनेरच्या गांधी चौकात झालेले साने गुरुजींचे हे ऐतिहासिक व आवेश पूर्ण भाषण आजही प्रेरणादायी वाटते . पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच जणू अग्निबाण ! जाज्वल्य देशभक्ती ,त्याग ,सेवा , स्वावलंबन . अपार करुणा व प्रेम यांचा सुरेख संगम होय . अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते ,. भावनाशील साहित्यिक, उत्तम संपादक , सच्चे सेवक . संस्कार भूषण ., प्रभावी वक्ते , उत्तम राजकारणी ,प्रभावी प्रचारक , संत प्रवृत्तीचे उत्तम शिस्तप्रिय शिक्षक म्हणजे साने गुरुजी ! त्यांची कर्मभूमी खानदेश होती .
साने गुरुजींचा जन्म 24 डिसेंबर ।899 रोजी कोकणातील पालगड येथे गरीब कुटुंबात झाला . पांडुरंगांना आई प्रेमाने ' श्याम ' म्हणायच्या . श्यामची आई म्हणजे थोर हृदयाच्या यशोदामाई !प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते शिकले .लहान वयात देखील त्यांच्या मनात कणव होती . गरिबां बद्दल अपार माया होती . आईचे अंतःकरण त्यांना लाभले होते . सर्व अडचणींवर मात करून श्याम चांगल्या मार्कांनी मॅट्रिकची परीक्षा पास झाले . नंतर न्यू पूना कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला .महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी त्यांना बी . ए . ला मराठी विशेष शिकवला . गुरुजी मराठी विषय घेऊन चांगल्या मार्कांनी बी . ए .ची परीक्षा उत्तीर्ण झाले . ते तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात दाखल झाले . तेथे त्यांना 60 रुपये फेलो शिप मिळायची . अंमळनेर म्हणजे विद्येचे तीर्थक्षेत्र होते . अमळनेरचे नाव साने गुरुजीं मुळे देशभर गाजले . प्रसिद्ध झाले . गोपाळराव गोखले हे मुख्याध्यापक असलेल्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये साने गुरुजी शिक्षक म्हणून लागले. 17जून 1924 रोजी ते शिक्षक म्हणून 50 रुपये महिना पगारावर रुजू झाले . मायेच्या वृतीने साने सर शिकवत असल्याने साऱ्या विद्यार्थ्यांचे त्याकाळी ते आवडते शिक्षक बनले . आजही नितांत गरज आहे अशा विचारांची नि संस्कारांची . वसतीगृहातील मुलांची आई म्हणून ते वावरले . मायेच्या ममतेने सेवा करून गुरुजींनी विद्यार्थी घडविले .
1930 सालच्या मार्च महिन्यात साने गुरुजींनी सहा वर्षांच्या वास्तव्यानंतर अमळनेर येथील शाळेला रामराम ठोकला .आणि भारत मातेच्या सेवेसाठी त्यांनी आपले उर्वरित जीवन झोकून दिले . स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली .साने गुरुजींच्या भाषणाचे स्वरूप भीषण असायचे. पुढे स्वातंत्र्यसंग्रामात साने गुरुजींनी मिरवणुकीचे नेतृत्व केले .त्याबद्दल त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारांवर लाठी हल्ला करण्यात आला .धुळे येथील .मॅजिस्ट्रेट ने त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली .
1938 साली खान्देशात ओला दुष्काळ पडला . मुसळधार पावसामुळे तीन आणेही पीक आले नाही गोऱ्या कलेक्टरने 12आणे पीक आल्याचा अहवाल (खोटया आणेवारीचा रिपोर्ट ) सादर केला . शेतकऱ्यांच्या घरादारावर जप्त्या आणल्या . तेव्हा शेतकऱ्याच्या सुखदुःखाची जाणीव गुरुजींना झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अन्यायाला ,त्याच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी साने गुरुजींनी जाहीर सभा घेतली . 26 जानेवारी 1939 रोजी खान्देशातील लाखो किसानां चा मोर्चा कलेक्टर कचेरीवर नेण्याची त्यांनी घोषणा केली. ते आता शेतकऱ्यांचे नेते बनले .
आता उठवू सारे रान । आता पेटवू सारे रान । माझ्या खान्देशचा जागा झाला किसान। ।
असे उत्स्फूर्त क्रंतिगीत गुरुजींच्या मुखावाटे बाहेर पडले . उलटसुलट विचारसरणीच्या स्वार्थी राजकारणी नेत्यामुळे पारतंत्र्यात ही देश देशोधडीला लागला होता .
पंढरपूरच्या विठोबाचे देवालय हरीजनांना खुले व्हावे म्हणून गुरुजींनी प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्धार केला .दहा दिवसातच त्यांच्या उपोषणाला यश आले . ते श्रेष्ठ दर्जाचे वक्ते होते . त्यांनी सुंदर पत्रे , क्रांती , तीन मुले , चित्रकार ,आस्तिक रंगा व भारतीय संस्कृती इत्यादी 100 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली . 1948 साली आपल्या मताच्या प्रचारार्थ ' साधना ' नावाचे साप्ताहिक सुरू केले. लोकशाही समाजवाद हे त्या पत्राचे ध्येय होते . त्यांच्या लेखनामध्ये भावनेची उत्कटता व विचारांची उदात्तता अनुभवायला मिळते . त्यांचे 'बलसागर भारत होवो ।। विश्वात शोभूनी राहो ' ॥हे गीत आता महाराष्ट्रातील समारंभात व विद्यालयात प्रार्थनेच्या रूपाने आजही म्हटले जाते . त्यांनी स्वतःचा संसार केला नाही . संपूर्ण आयुष्यभर देशाचा संसार केला .साधना व सेवादल आणि आंतरभारती या तीन संस्थांच्या रूपाने गुरुजींनी असंख्य लोकांना व भावी पिढीला प्रेरणा दिली . देशभक्तीच्या या प्रेषिताने राणी लक्ष्मीबाई , रामकृष्ण परमहंस , चिमाजी आप्पा , अब्राहम लिंकन , गॅरीबाल्डी व शेले या महान व्यक्तींचा आदर्श लोकांपुढे मांडला . समाजातील भेदाभेद तसेच आर्थिक विषमता या वाईट गोष्टी गुरुजींना सहन न झाल्याने त्यांनी 11 जून 1950 रोजी आपले जीवन संपविले . मुंबईच्या के .ई .एम . रुग्णालयात त्यांचे दुःखद निधन झाले . कोकणात जन्मलेल्या व्यक्तीने आपल्या महान कर्तबगारीने खान्देशची भूमी पावन केली . अमळनेर चे नाव साने गुरुजीं मुळे साऱ्या भारतात नव्हे साऱ्या जगात निनादले .धन्य ते साने गुरुजी ! देशासाठी आणि समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या व तेजस्वी विचारांनी पिढी घडवणाऱ्या अशा साने गुरुजींना सादर प्रणाम !
- डॉ आनंदराव सूर्यवंशी