- डॉ आनंदराव सूर्यवंशी 17/05/2025 lekh Share
(15 मे 1907-23मार्च 1931)
सन 1928 मध्ये सायमन कमिशन लाहोर मध्ये आले. त्यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांना जेम्स स्कॉट आणि जे. पी.सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्यांकडून मारहाण झाली. त्यामुळे त्यांचे निधन झाले. त्याचा सूड म्हणून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर यांनी साँडर्स ला गोळ्या घालून ठार केले. शहिदांचे मेरुमणी शहीद भगतसिंग यांचे बरोबरीने शिवराम राजगुरू व सुखदेव थापर यांचेही नाव आदराने घेतली जाते. आज थापर यांची जयंती आहे.
सुखदेव थापर यांचा जन्म दिनांक 15 मे 1907 रोजी लुधियाना जिल्ह्यातील ल्यालपुर तालुक्यातील नौघर गावी (आता पाकिस्तानात आहे) झाला .त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल व आईचे नाव रल्ली देवी असे होते .वडिलांचे निधन त्यांच्या जन्माच्या तीन महिने आधीच झाले, त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या काका व काकी यांनी केला .पुढे लाहोर नॅशनल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले ब्रिटिशांचे अत्याचार आपल्या देशातील लोकांना असह्य होत होते, म्हणून सुखदेव यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला. त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पुढे त्यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली. स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित प्रोत्साहित करणे, तर्क संगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे, जातीयते विरुद्ध लढणे तसेच अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे अशी ह्या सभेची उद्दिष्टे होते. या संघटनेने बऱ्याच क्रांतिकारक चळवळींमध्ये भाग घेतला होता आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला होता.
वस्तुस्थिती अशी होती की, 17 नोव्हेंबर 1928 रोजी लाला लजपतराय यांचे निधन झाले होते.सदर बाब ब्रिटिश संसदेपर्यंत पोहोचली होती तरी ब्रिटिश सरकारने स्कॉट आणि सॉन्डर्स यांना जबाबदार धरले नाही.त्यानंतर भगतसिंह आणि सुखदेव यांनी लालाजिंच्या मृत्यूचा सूड घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी इतर क्रांतिकारकांची ही मदत घेण्याचे ठरवले.
17 डिसेंबर 1928 रोजी जॉन साँडर्स ची स्कॉट समजून हत्त्या करण्यात आली.पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी धरपकड चालू केली.सुखदेव थापर व इतर क्रांतिकारक दोन दिवस लपून बसले.19 डिसेंबर1928 रोजी भगतसिंग व सुखदेव नियोजनाप्रमाणे लाहोर येथे पोहोचले .त्यासाठी त्यांना भगवती चरण वोहरा यांच्या पत्नी दुर्गादेवी यांची मदत मिळाली.
8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीतील असेंब्ली हॉलमध्ये भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकल्यानंतर क्रांतिकारकांची मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू करण्यात आली. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनाही पकडण्यात आले. त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले .सुखदेवने 1929 मध्ये लाहोर तुरुंगात असताना कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले . त्यांच्यावर हत्ते चा आरोप ठेवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. लाहोरच्या तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे बाहेर काढले गेले आणि त्यांचा लाहोर पासून साधारणपणे 50 मैल दूर असलेल्या हुसैनिवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले .तेव्हापासून देशात क्रांतीची लहर सुरू झाली आणि ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या लढाईला नवी दिशा मिळाली.शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर यांना त्रिवार वंदन!!!
- डॉ आनंदराव सूर्यवंशी