- डॉ.आनंदराव सूर्यवंशी 27/05/2025 lekh Share
14 नोव्हेंबर 1889 - 27 मे 1964
आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते, जागतिक शांततेचे पुरस्कर्ते, आधुनिक भारताचे शिल्पकार व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला .त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूपा राणी असे होते. या सुपुत्राचे बालपण अत्यंत वैभवात गेले .लाडक्या जवाहरलाल चे प्राथमिक शिक्षण घरीच करून घेतल्यावर त्याला माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले. बॅरिस्टर व एम. ए. या पदव्या संपादन केल्यानंतर जवाहरलालजींनी लंडनमध्ये वकिली व्यवसायात पदार्पण केले. भारतात सक्रिय राजकारणात सहभाग घेण्यात त्यांना जास्त आवश्यक वाटलं. सर्व ऐहिक सुखा कडे जाणतेपणे पाठ फिरवून वडिलांचा रोष पत्करून 1912 साली ते मायदेशी परतले. प्रारंभीच्या अनेक वर्षात जवाहरलाल नेहरू यांना वैयक्तिक आयुष्य असे जवळजवळ नव्हतेच. देशाच्या मुक्ततेसाठी /स्वातंत्र्यासाठी तुफानी प्रचार करावयाचा, दौरे काढावयाचे, भाषणे द्यावयाची व तुरुंगात जावयाचे हाच एक त्यांच्या जीवितचा मुख्य भाग होऊन बसला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या सर्वच जीवनाचा आविष्कार देशाच्या मानवजातीच्या कल्याण दायक गोष्टी घडून आणण्यात झाला असल्याचे स्पष्ट निदर्शनात येते. इकोणीसाव्या शतकातील विविध घडामोडींनी जग झपाटलेलं होतं. भारतातील1 857 चे बंड व 1871 मधील 'पॅरिसcomun 'या घटना ऐतिहासिक ठरल्या. उदारमतवाद आणि क्रांतीकारी समाजवाद यांचं मिश्रण असलेला फेबियनवाद 'febianvad. ' हा पंडित नेहरूजीं वरचा पहिला वैचारिक राजकीय संस्कार ठरला.
नाना विषयांवरील ग्रंथांचे वाचन, मनन व चिंतन जवाहरलाल नेहरूंनी कारागृहात केले. त्यांच्या बहि र्मु खी व्यक्तिमत्त्वाचे पैलू बंदी वासातच आकारास आले आहेत ,असे म्हटल्यास वावगे होणार नाही नेहरूजी मुत्सद्दी होते. देशाचे पुढारी होते. विख्यात राजकारण पटू होते. तसेच ते एक थोर अभ्यासक होते .चिंतनशील तत्त्वज्ञ होते. कवी वृत्तीचे लेखक होते देखणे ,सुंदर तरुण होते. कमला कौल नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला.
कृष्णा हाथी सिंग या त्यांच्या बहिणीने आपल्या भावाचे 'विथ नो रिग्रेट्स ' या ग्रंथांत एक रमणीय शब्दचित्र रेखाटले आहे.त्यात त्या म्हणतात,"राजकारणातून वाचलेला वेळ तो वाचनात दवडतो.परंतु लिहिण्याचे काम बहुधा तो तुरुंगातच करतो."हे विधान सत्य वाटते.1917साली जवाहरलाल नेहरू यांना इंदिरा (प्रियदर्शिनी)कन्यारत्न झाले.पुढे दहावर्षानंतर, 1927--28साली त्यांनी प्रिय कन्येस, इंदिराजी यांना जी पत्रे लिहून पाठवली,त्या पत्रांतून इतिहासकालीन प्रमुख घटनांचे जे मार्मिक चित्रण( टिप्पणी)केले आहे,त्याला जगाच्या वाङ्मयात तोड नाही ,असे म्हणतात. त्याचा विस्तार जवाहरलाल नेहरूंनी आपल्या 'Glimpsesऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या जगप्रसिद्ध ग्रंथात केला आहे. नैनी, बरेली, डेहराडून या ठिकाणच्या तुरुंगवासात पंडितजींनी आपल्या कन्येस इंदिरेस जी 200 विस्तृत पत्रे लिहिलीआहेत ,त्यांचाच हा इतिहासा वरील ग्रंथ निर्माण झाला. इंदिरा गांधी निमित्त मात्र असून जगातील कोणाही जिज्ञासू मुलास व मुलीस सहजासहजी इतिहास ज्ञान होईल इतक्या सोप्या व रसाळ पद्धतीने नेहरुंनी जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन घडविले आहे .1934-35 मध्ये तुरुंगात असतानाच जवाहरलालजींनी आपले जगप्रसिद्ध' आत्मवृत्त' लिहिले. कारावासातील कठीण दिवस सहजासहजी निघून जावेत म्हणून त्यांनी हातात लेखणी घेतली आणि जगातील पहिल्या प्रतीची 'आत्मकथा' जन्मास आली. नेहरू घराण्याची त्यात कहाणी आहेच पण हिंदुस्तान देश स्वतंत्र व्हावा या उद्देशाने क्रांतिकारकांनी कसे प्रयत्न केले, याचे विवेचन केले आहे, असे दिसते. तसेच सदर ग्रंथाच्या पानोपानी काव्यमय विचार आणि देशाच्या उन्नती संबंधीची चर्चा वाचावयास मिळते पुढे 1936 साली ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते आणि याच काळात एका अर्थाने' नेहरू युग' सुरू झालं होतं.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ म्हणजे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया 'त्यांच्या प्रतिभेस नगरच्या तुरुंगात असताना हिंदुस्तान चा शोध लागला. पुन्हा एकदा त्यांनी हिंदुस्तान -- इतिहासा कडे लक्ष दिले आणि आर्यांच्या काळापासून आधुनिक काळातील राष्ट्रीय पुनरूत्थानापर्यंतच्या मार्गावर त्यांनी दृष्टी फिरवली. नेहरुजी या ग्रंथात तत्त्वज्ञ बनलेले दिसतात. धर्म ,शास्त्र, तत्त्वज्ञान यांच्या साह्याने त्यांनी भारताचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ जगासमोर आला तो स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी. 1942 च्या चलेजाव चळवळीतील धामधुमीत आणि महात्मा गांधी यांच्या चौकटीत राहून देखील जवाहरलालजींचा स्वतंत्र व समांतर दबदबा निर्माण झाला होता. 'आधुनिक भारताचे शिल्पकार' म्हणून भारतीय जनता त्यांच्याकडे आशेने पाहू लागली होती .शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला नेहरू जी वयाच्या 57 व्या वर्षी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले . नेहरूंच्या काळातच 1962 ला चीन युद्ध झाले. पंचवार्षिक योजनाही त्यांनी यशस्वीपणे राबवल्या 17 वर्षाहून अधिक काळ त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा वाहिली. त्यांनी भारताला वैज्ञानिक दृष्टिकोन व आर्थिक नियोजन या दोन बाबी दिल्या राष्ट्रपतींनी त्यांना "भारतरत्न" हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे 27 मे, 1964 रोजी त्यांचे पंतप्रधान पदावर असतानाच वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. नव-भारताची उभारणी करू पाहणाऱ्या दृष्ट्या व महान नेत्यास त्रिवार वंदन!
- डॉ.आनंदराव सूर्यवंशी