team jeevandeep 03/05/2025 lekh Share
आयपीएल म्हणजे रत्नांची खाण असे म्हंटले जाते कारण दरवर्षी आयपीएल मध्ये असे काही नवीन रत्न उदयास येते की ज्या रत्नांनी संपूर्ण क्रिकेट विश्वच उजळून निघते. अशाच एका उगवत्या रत्नाने केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वच उजुळून निघाले आहे आणि हे रत्न आहे अवघ्या १४ वर्षाचं आणि त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. सध्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी या १४ वर्षाच्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे अर्थात त्याने तसा कारनामा ही करून दाखवला आहे. मूळचा बिहार राज्यातील असलेला वैभव सूर्यवंशी हा अवघा १४ वर्षाचा युवा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्स या संघाने ज्यावेळी त्याच्यावर १ कोटी १० लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले त्याच वेळी त्याची चर्चा सुरू झाली. राजस्थान रॉयल्स संघाने या १४ वर्षाच्या मुलावर इतका मोठा दाव का लावला असा प्रश्न विचारला गेला त्याचे उत्तर शोधण्यासाठी थोडं मागे जावे लागेल. वैभव सुर्यवंशीने १२ व्या वर्षीच बिहार कडून १९ वर्षाखालील संघातून विनू मंकड चषक स्पर्धेत भाग घेतला. तिथे त्याने चांगली कामगिरी केल्याने त्याची निवड बिहारच्या रणजी संघात करण्यात आली. बिहारकडून रणजी स्पर्धेत खेळणारा सर्वात कमी वयाचा तो खेळाडू ठरला. १३ व्या वर्षी वैभवने विजय हजारे चषकात धावांचा रतीब घातला त्यामुळे त्याची भारताच्या १९ वर्षाखालील ब संघात निवड झाली. चार संघात झालेल्या स्पर्धेत त्याने ६ डावात १७७ धावा काढल्या त्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या १९ वर्षाखालील मुख्य संघात त्याची निवड झाली. १९ वर्षाखालील कसोटीतील पदार्पणाच्या सामन्यात त्याने अवघ्या ५८ चेंडूत शतक झळकावले त्यावेळी त्याचे वय १३ वर्ष होते. त्यानंतर १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत तर त्याने धुमाकूळ घातला. तिथे युएई विरुद्ध त्याने ४६ चेंडूत ७६ धावा काढल्या तर उपांत्य फेरीत श्रीलंके विरुद्ध ३६ चेंडूत ६७ धावा काढल्या. या स्पर्धेपासून त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. ही चर्चा राजस्थान रॉयल्स संघाच्या पदाधिकाऱ्यांना समजली. त्यांनी त्यांचा बॅटिंग कोच असलेल्या विक्रम राठोडला वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहण्यास सांगितली. विक्रम राठोड यांनी वैभवला खेळताना पाहिले आणि त्याला आपल्या संघात घेण्याचे निश्चित केले. त्यांचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा तर नवोदित खेळाडूंना संधी देण्यास प्रसिद्ध आहे. त्याने देखील वैभवची फलंदाजी पाहिली आणि त्याला संधी देण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्याची राजस्थान संघात एन्ट्री झाली. आयपीएल सुरू झाली पण सुरुवातीच्या काही सामन्यात वैभवला संधी मिळाली नाही. लखनऊ या संघाविरुद्ध राजस्थान रॉयल्सने त्याला संधी दिली. वैभव या संधीची वाटच पाहत होता. त्याने या संधीचे सोने करायचे ठरवले आणि पहिल्याच चेंडूवर त्याने अनुभवी शार्दुल ठाकूरला पुढे सरसावत षटकार खेचला आणि सर्वांना चकित केले. या सामन्यात त्याने २० चेंडूत ३४ धावा काढून आपल्या आयपीएल कारकिर्दीची धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यातही त्याने चांगली खेळी केली मात्र आपल्या तिसऱ्या सामन्यात तर त्याने कमाल केली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या या सामन्यात त्याने केवळ ३८ चेंडूत १०१ धावांची धमाकेदार खेळी करत शतक झळकावले. या शतकासोबत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. तो आयपीएल इतिहासातील सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा खेळाडू ठरला. केवळ आयपीएलच नाही तर टी २० क्रिकेट इतिहासात सर्वात कमी वयाचा शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो भारतीय ठरला. त्याने अवघ्या ३६ चेंडूत शतक झळकावत युसुफ पठाणचा विक्रम मोडला. एका सामन्यात त्याने सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. या सामन्यात त्याने ११ षटकार खेचले ते ही ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि राशिद खान या आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध. त्याच्या या धडाकेबाज खेळीने सर्व आजी माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरने वैभवच्या खेळीवर ट्विट केले की " वैभवची निडर शैली, उत्कृष्ट बॅट स्पीड, चेंडूची लांबी पटकन ओळखण्याची क्षमता आणि चेंडूच्या मागे ताकद लावण्याची तयारी, या सर्वांचा संगम त्याच्या धमाकेदार खेळीेमागे होता. ३८ चेंडूत १०१ धावा जबरदस्त कामगिरी. जबरदस्त खेळ....!"
केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे तर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या कौतुकाचे इमले बांधले. केवळ खेळाडूच नव्हे तर क्रिकेट प्रेमींनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. क्रिकेट प्रेमींनी त्याच्या या खेळीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मीडिया तर त्याच्यावर फिदाच झाली. त्याच्या या खेळीने त्याने आपण भारताचे भविष्य आहोत हे दाखवून दिले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्याने लहान वयातच आपण कोण होणार हे दाखवून दिले आहे. त्याच्या या लाजवाब खेळीने त्याच्यावर अचानक प्रसिद्धीचा झोत आला आहे. वैभवने मात्र या झगमगाटाकडे दुर्लक्ष करून खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्याला आणखी यशोशिखरे गाठायची असेल तर त्याने झगमगाटापासून दूर राहिलेलेच बरे. प्रसिद्धीच्या झगमगाटात वाहत जाऊन आपल्या करिअरचे मातेरे करणारे अनेक खेळाडू आपण पाहिले आहेत. विनोद कांबळी, पृथ्वी शॉ ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. वैभवने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून आणखी मेहनत केल्यास तो भारतीय क्रिकेटचे भविष्य ठरेल यात शंका नाही. वैभवला खूप खूप शुभेच्छा !
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे