Visitors: 228123
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

मानवतेला काळीमा फासणारी घटना

        22/08/2024      lekh    Share


मानवतेला काळीमा फासणारी घटना

     कोलकात्यात एका डॉक्टर असलेल्या  तरुण मुलीवर झालेल्या अत्याचाराने देशात संतापाची लाट उसळली असतानाच आपल्या  महाराष्ट्रात त्याहून संतापजनक घटना घडली . बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर  शाळेतच अत्याचार झाला. मन सुन्न करणारी ही घटना समोर आल्यावर नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि यात दोषी असलेल्या नराधमाला फाशी द्यावी यासाठी नागरिक मैदानावर उतरून आंदोलन करू लागले. बदलापूरच्या घटनेने केवळ बदलापूर मध्येच नव्हे तर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे.  मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने  राज्यात महिला तसेच मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अर्थात महाराष्ट्रात घडलेली ही पहिली घृणास्पद घटना नाही मागील काही वर्षात तर अशा घटनांची मालिकाच सुरू आहे मागील वर्षीच  पहाटे कामावरून घरी परतणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वानवडी परिसरात घडली होती.  त्याआधी  मुंबईतील सावित्रीबाई फुले  वसतिगृहातील विद्यार्थिनीची सुरक्षा राक्षकाने हत्या केल्याची बातमी आली होती. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसहुन वाशिकडे हार्बर रेल्वेने परीक्षेसाठी येणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर एका नाराधमाने मज्जीद बंदर जवळ धावत्या डब्यातच लैंगिक बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. कोपर्डीची घटना तर अजूनही ताजीच आहे अर्थात वर उल्लेख केलेल्या घटना या फक्त प्रातिनिधिक आहेत अशा घटना आपल्या राज्यात दररोज घडत असतात. दररोजच्या वर्तमानपत्रात महिला अत्याचाराची एक तरी घटना वाचायला मिळतेच. घटना घडून गेल्यावर शासनाकडून  घटनेच्या चौकशीचे आणि पोलिसांकडून आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले जाते अर्थात  घटना घडून गेल्यानंतर आरोपींना पकडून शिक्षा देण्यापेक्षा महिला अत्याचाराच्या घटना घडूच नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. बदलापुरात बारा तासांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात इतकी  असंवेदनशीलता दाखवणे निषेधार्हच आहे अर्थात पोलिसांनी असे करावे यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता का ? याचीही चौकशी व्हायला हवी. यात शाळा प्रशासनाची देखील मोठी चूक आहे. शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केल्याचे वरकरणी दिसत आहे.  दिवसाढवळ्या महिलांची, मुलींची अब्रू लुटून त्यांची हत्या करण्याची नाराधमी प्रवृत्ती अलीकडे जोर धरू लागली आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे गुन्हे करण्याची हिंमत नराधमांमध्ये निर्माण होते याचाच अर्थ या नराधमांना कायद्याचा आणि राज्यातील सुरक्षा यंत्रणांचा धाक राहिला नाही. आपण कितीही मोठा गुन्हा केला तरी कायदा आपले काहीही करू शकत नाही. पैशाच्या जोरावर आपण कायदा आणि सुरक्षा यंत्रणांना  आपण वाकवू शकतो अशीच धारणा या नराधमांची झाली आहे म्हणूनच ते असे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करत आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना शोभणीय नाहीत. पुरोगामी महाराष्ट्राला खाली मान घालायला लावणाऱ्या या घटना आहेत.  महिलांकडे उपभोगी वस्तू म्हणून  पाहण्याची पुरुषी मानसिकता वाढू लागली आहे हीच मानसिकता यामागे कारणीभूत आहे.  आज राज्यातील कोणत्याच महिला सुरक्षित नाही मग ती तीन वर्षाची चिमुरडी असो की सत्तर वर्षाची आजी. शाळा, कॉलेज, कामाचे ठिकाण, सार्वजनिक वाहन, स्वतःचे घर इतकेच काय तर पोलीस स्टेशन देखील महिलांसाठी सुरक्षित नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पूर्वी अशा घटनांसाठी बिहार आणि उत्तरप्रदेश ही राज्ये प्रसिद्ध होती आता त्यात महाराष्ट्राची भर पडते की काय अशी शंका येऊ लागली आहे. महाराष्ट्राचा बिहार, उत्तरप्रदेश होऊ नये यासाठी सरकारने आणि पोलीस दलाने महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात तसेच संबंधित गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी तसे झाले तरच राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल आणि पुरोगामी महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख कायम राहील.     

 

 श्याम ठाणेदार     

 दौंड जिल्हा पुणे     ९९२२५४६२९५

+