team jeevandeep 06/04/2025 lekh Share
सध्या सर्वत्र उन्हाचा जोर वाढतो आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक उकाडा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानेही वर्तवला आहे. राज्यात काही ठिकाणी मुलांच्या परीक्षा संपून शाळांना सुट्टी पडली आहे. अभ्यासाचा ताण नसल्याने मुले दिवसभरातील अधिकाधिक वेळ खेळण्यात व्यतीत करत आहेत. बाहेर खेळायला जाणाऱ्या मुलांना उन्हातान्हाची पर्वा नसते. अधिक वेळ उन्हात राहिल्याने घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार निघून जातात ज्यामुळे थकवा येतो. अशावेळी मुले घरी येऊन पालकांकडे कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी पैसे मागतात. बऱ्याचदा पालकही त्यांना पैसे देऊन त्यांची इच्छा पूर्ण करतात. सध्या बाजारात मिळणारे अनेक प्रसिद्ध ब्रॅंड्सचे कोल्ड्रिंक्स लहान मुलांसाठी अपायकारक आहेत. अशा कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांवर ठळक अक्षरांत तशी सूचना लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. ही कोल्ड्रिंक्स जिभेला रुचकर वाटून मनाला गारवा देणारी असली तरी ती बनवण्यासाठी रसायनांचा आणि प्रीझर्वेटिव्हचा वापर करण्यात येत असल्याने लहान मुलांच्या नाजूक शरीरासाठी ती अत्यंत हानिकारक असतात. आहारतज्ज्ञांच्या मते कोल्डड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात साखर असते. साखर जास्त प्रमाणात पोटात गेल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढू शकतो. मुले जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स पिट असतील तर त्यांच्या शरीरातील कॅलरीज वाढल्याने त्यांचे अनावश्यक वजन वाढू शकते. कोल्ड्रिंक्समध्ये असणाऱ्या साखर आणि अन्य रासायनिक घटकाकांमुळे मुलांचे दात किडण्याचा धोका संभवतो. थंड आणि रसायनयुक्त असलेले हे कोल्ड्रिंक्स दातांच्या मुळांना कमकुवत करतात. मुलांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मुलांमध्ये टाइप २ डायबिटीसचा धोका वाढू शकतो. काही थंड पेयांमधील रसायनांच्या अतिवापरामुळे मुलांच्या हाडांतील खनिजांचे प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होतात ज्यामुळे मुलांमध्ये हाडांच्या दुखापतीचा आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. १०० टक्के फळांचा रस असण्याचा दावा करणारे काही कंपन्यांचे फ्रुट ज्यूसचे टेट्रा पॅक बाजारांत उपलब्ध आहेत; मात्र त्यामध्ये प्रत्यक्षात फळांचा रस किती आणि इतर रसायने किती आहेत हे पॅकेटवरील घटकांचे प्रमाण वाचल्यावरच लक्षात येते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत असे तयार कोल्ड्रिंक्स मुलांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळण्याऐवजी घरी तयार केलेले कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक किंवा बाजारातून ताजी फळे आणून मुलांना फळांचा रस द्यावा. घरगुती पेय प्यायल्याने उन्हामुळे मुलांच्या शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता तर भरून निघेलच शिवाय मुलांना व्हिटॅमीन्स आणि मिनरल्ससुद्धा या पेयांतून मिळेल. केवळ मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांनीही उन्हाळ्यात रासायनिक शीतपेय पिण्याऐवजी घरगुती पेय पिऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्य जपावे !
- सौ. मोक्षदा घाणेकर,
काळाचौकी, मुंबई