team jeevandeep 01/04/2025 Crime Stories Share
धाराशिव :
जिल्ह्यातील कळंब शहरात वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील आडसच्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला. मनीषा बिडवे ( वय, 40 ) असे मृत महिलेचे नाव आहे. मनीषा बिडवेचा वापर करून सरपंच संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले होते. पण, मनीषा बिडवे हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हत्या प्रकरणात रामेश्वर उर्फ राहण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद, अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. रामेश्वर भोसले हा मनीषा बिडवेच्या कारचा चालक होता.
बीड जिल्ह्यातील आडस येथील मनिषा बिडवे ही महिला काही महिन्यांपासून कळंब शहरात एकटीच वास्तव्यास होती. मागच्या आठवड्यापासून घरात कोणतीही हालचाल होत नसल्याने शेजाऱ्यांना ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी दार उघडून पाहिले असता मनिषा बिडवेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढला. महिलेच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. हातोडाही जवळच पडला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता रामेश्वर भोसले आणि उस्मान गुलाब सय्यदला अटक करण्यात आली. यावेळी चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत.
रामेश्वरने मनीषा बिडवेचा खून केल्यावर तिच्यासोबत त्याच खोलीत झोपला होता. मृतदेहाशेजारी बसून त्याने जेवणही केले. पण, तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला होता. मनिषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
अंजली दमानियांचा दावा काय?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखावर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारका नगरमधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय. या महिलेची 5 दिवसापुर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबधातून हत्या झाली, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे, मनीषा मनोज बियाणी, मनीषा राम उपाडे, मनीषा संजय गोंदवले, अशा नावांचा वापर करायची,” असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला होता.