Thane jeevandeep team 26/08/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कल्याणात बासरी वादकांनी सादर केलेल्या सुमधुर बासरी वादनाने कल्याणकर रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले. आणि सुप्रसिद्ध बासरी वादक पंडीत विवेक सोनार यांच्या बासरी वादनाने तर या सूरमयी कार्यक्रमाचा कळसाध्याय रचण्याचे काम केले. निमित्त होते ते कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "स्वरवेणू प्रतिष्ठान"च्या परंपरा - २०२४ या वार्षिक कार्यक्रमाचे.
बासरी हे आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन पारंपरिक वाद्यांपैकी एक वाद्य. आणि त्यातही श्रीकृष्ण आणि बासरीचं तर अतूट नातं. एकमेकांशिवाय दोघेही जणू काही अपूर्णच. या श्रीकृष्णप्रिय बासरीचे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतातही तितकेच अढळ असे स्थान. या पार्श्वभुमीवर हे बासरी वाद्य आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार - प्रचार करण्यासाठी कार्यरत असणारे स्वरवेणू प्रतिष्ठान.
या श्रीकृष्णप्रिय बासरीचे जादूगार अशी ज्यांची ओळख असणारे जागतिक कीर्तीचे बासरी वादक पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचे, पंडीत विवेक सोनार हे शिष्य. आणि या पंडीत विवेक सोनार यांचे शिष्य असलेल्या प्रशांत बानिया यांची ही स्वरवेणू प्रतिष्ठान संस्था. या स्वरवेणू प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशांत बानीया यांच्याकडून उद्याच्या श्रीकृष्ण जयंतीचे औचित्य साधून अतिशय सुंदर आणि सुमधुर अशा या बासरी वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रशांत बानिया हे दृष्टीहीन असूनही ते या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेकांना बासरी वादनाचे धडे देत आहेत.
आचार्य अत्रे रंगमंदिरात आज झालेल्या कार्यक्रमात 7 वर्षांपासून ते 70 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 50 शिष्यांनी अतिशय सुमधुर असे बासरी वादन सादर केले. ज्यामध्ये शास्त्रीय संगीतासह चित्रपटातील लोकप्रिय गाणीही बासरीच्या माध्यमातून सादर करण्यात आली. ज्याला उपस्थित कल्याणकर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर मध्यांतरानंतर स्वरवेणू प्रतिष्ठानच्या प्रशांत बानिया यांनी एकल बासरी वादन सादर केले. ज्यांना स्वप्निल भाटे यांनी तबल्यावर साथ दिली. आणि त्यापाठोपाठ सुरमणी पंडीत विवेक सोनार यांनीही सुमधुर असे एकल बासरी वादन सादर केले. ज्याला उस्ताद अल्लारखा यांचे शिष्य तालमणी पंडीत आदित्य कल्याणपूर यांनी तबल्यावर साथ दिली. या सुमधुर अशा कार्यक्रमाचे प्राजक्ता आपटे यांनी तितक्याच रसाळ भाषेत सूत्रसंचालन केल्याचे दिसून आले.