22/08/2024 स्थानिक बातम्या
रेल्वे समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १० हजार प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती
अभियानाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फेर्या सोडा, ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा द्या, महिला विशेष लोकल सोडा या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी रेल्वेला जाग यावी यासाठी काळी फित आणि पांढरा शर्ट, कुर्ता घालून प्रवास अभियानाला दहा हजारांहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला.
संघटना बरोबर कार्य करत असून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा उत्स्फूर्त पाठींबा नागरिकांनी दिला. विशेषतः युवा वर्ग, महिला, दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य केले. रेल्वे पोलीस दल, लोहमार्ग पोलीस यांनीही सहकार्य करून संघटनेला एकप्रकारे पाठिंबाच दिला असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. रेल्वेचा निषेध नव्हे तर आता तरी जागे व्हा या टॅग लाईनखाली संघटनांनी काळी फित बांधली. सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवललीचे आहेत, त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. आबालवृद्ध नागरिक त्यात काळी फित बांधण्यासाठी पुढे आले होते.
मुंबई महानगर प्रदेशातील लोकल प्रवासी आज शब्दशः आपला मृत्यू पाठीशी घेऊनच लोकल प्रवास करीत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहमार्ग पोलिसां कडील अधिकृत आकडेवारी पाहिली तरी हे ज्वलंत वास्तव आपल्या लक्षात येईल. दीर्घकाळ रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, प्रवाशांच्या तुलनेत न वाढणार्या लोकल फेर्या, मेल एक्स्प्रेस माल गाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेतच सातत्याने लोकल उशिराने चालविणे, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही न करणे, साध्या लोकल ऐवजी वातानुकूलित लोकल चालविणे, सातत्याने लोकल सेवा विस्कळीत होणे या सर्व गंभीर गोष्टींमुळे आज लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त आणि संकटात असून संतप्त झाले आहेत.
मागील अनेक वर्षे सुरू असलेल्या रेल्वेच्या या प्रशासकीय अनास्थे विरुद्ध मुंबई रेल प्रवासी संघाच्या आवाहना नुसार एमएमआर मधील लोकल प्रवाशांनी सफेद कपडे व काळी फित लावून प्रवास केला. अत्यंत शांततेच्या वातावरणात हे अभियान संपन्न झाले. यावेळी महासंघ अध्यक्ष लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, कौस्तुभ देशपांडे, रेखा देढिया, तन्मय नवरे, शशांक खेर, सागर घोणे आदींसह संघटनांचे महिला, पुरुष पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले होते.