Team jeevandeep 22/08/2024 स्थानिक बातम्या
बदलापूर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याबाबत दिल्या सूचना
कल्याण : बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या उग्रआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांची बैठक खडकपाडा पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे व खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांनी उपस्थित मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून बदलापूर येथील घटनेची पुनरावृत्ती आपल्या शाळेत होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. ज्यामध्ये शाळेत सर्वत्र जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व कॅमेरे बसवलेले असल्यास ते सुस्थितीत चालू आहे की नाही याबाबत खात्री करून ते बंद असल्यास तात्काळ चालू करून घ्यावेत.
मुलींना नैसर्गिक विधी करिता नेण्यासाठी महिला सेविका नेमाव्यात तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. मुलींच्या विभागासाठी महिला कर्मचारी नेमाव्यात त्याच प्रमाणे आपल्या शाळेत कोणताही अनुचीत प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित मुख्याध्यापक, व्यवस्थापक यांच्या समस्याबाबत चर्चा करून त्यांचे निरसन करण्यात आले. याबैठकी करीता सर्व शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.