Thane jeevandeep 07/09/2024 लेख
१८५७ साली झालेला उठाव हा भारतीय इतिहासातील इंग्रजांविरोधात झालेला पहिला उठाव आहे असे मानले जाते मात्र त्या अगोदरही इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अनेक छोटेमोठे उठाव झाले मात्र त्यातील काही उठावांची नोंद इतिहासात घेण्यात आली तर काही काही उठावांची नोंदच झाली नाही. अशाच एका उठावाचे जनक ज्यांनी इंग्रजांना सलग १४ वर्ष पळता भुई केली त्या आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची आज जयंती. मात्र आज त्यांची जयंती असूनही त्यांची जयंती साजरी करावी असे कोणालाही वाटत नाही कारण ते ज्या समाजात जन्मले तो रामोशी बेडर समाज आजही उपेक्षितच आहे त्यामुळे इतका मोठा क्रांतिकारक भारताच्या इतिहासात होऊन गेला हे आजही अनेकांना माहीत नाही. आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म आजच्याच दिवशी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव दादोजी खोमणे होते. त्यांचे कुटुंबीय पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असे म्हणून त्यांना नाईक ही पदवी मिळाली पुढे ते नाईक याच नावानेच ओळखले जाऊ लागले. लहानपणापासून काटक, चंचल आणि शूर असणारे निधड्या छातीचे उमाजी नाईक यांना गुलामगिरीची चीड होते. १८३० साली इंग्रजांनी पुण्यात दुसऱ्या बाजीरावास स्थानापन्न केले तेंव्हा त्याने पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी रामोशी बेडर समाजाकडून काढून घेतली आणि स्वतःच्या मर्जीतील लोकांना ती जबाबदारी दिली त्यामुळे साहजिकच रामोशी समाज खवळला त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली जबाबदारी अशी अचानक काढून घेतल्याने उमाजी नाईक कमालीचे संतप्त झाले शिवरायांपासूनच स्फूर्ती घेऊन त्यांनी आपल्या काही साथीदारांसह इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याची शपथ घेतली. उमाजी नाईक समाजातील गोरगरिबांना आर्थिक मदत करत त्यासाठी ते इंग्रज, सावकार आणि मोठ्या वतनदारांना लुटत. जर कोणी माता भगिनींवर अन्याय करत असत तर ते भावाप्रमाणे धावून जात असत. या दरम्यान त्यांना एकदा अटक झाली त्यांना एका वर्षाची शिक्षा झाली. या एका वर्षात ते तुरुंगातच लिहायला शिकले. एका वर्षाची शिक्षा भोगून आल्यावर त्यांच्या कारवाया आणखी वाढल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लपून छपून लढाया केल्या. उमाजी नाईक यांच्या या गनिमीकाव्याने इंग्रज मेटाकुटीला आले. इंग्रज अधिकारी उमजींना पकडण्यासाठी जंग जंग पछाडत होते मात्र उमाजी त्यांच्या हातावर तुरी देत होते. एकदा इंग्रज आणि उमाजींचे सैन्य समोरासमोर आले तेंव्हा उमाजींच्या सैन्याने इंग्रजांच्या सैन्याचा पराभव केला. या लढाईत उमाजींनी पाच इंग्रजांची मुंडकी उडवली त्यामुळे इंग्रज अधिकच भयभीत झाले. त्यांच्या मनात उमाजींची भीती बसली. १८२४ ला उमाजींनी भाबुर्डी येथील इंग्रजांचा खजिना लुटून देवळाच्या देखभालीसाठी लोकांना वाटला. २१ डिसेंबर १८३० ला उमाजींनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून पळवून लावले. त्यांच्या या बंडाला जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत होता. उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यात त्यांनी नमूद केले होते की लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात. इंग्रजांविरुद्ध सर्वांनी एकत्र यावे. इंग्रज सरकार विरोधात अराजकता माजवावी. इंग्रजांचा खजिना लुटून तो गोरगरिबांना वाटावा. इंग्रजांशी असहकार पुकारवा. त्यांना शेतसारा, पट्टी देऊ नये. त्यांच्या या जाहिरनाम्याचे पालन सर्वसामान्य जनता करू लागल्याने इंग्रज आणखी बिथरले. त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी आता फोडा आणि झोडा नीती अवलंबली. उमाजींची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघा जमीन मिळेल असे बक्षिस ठेवले. इंग्रजांची ही नीती कामी आली. एका महिलेचे अपहरण केले म्हणून काळोजी नाईक याचे हात उमाजींनी कलम केले होते तो इंग्रजांना जाऊन मिळाला. उमाजींच्या जवळचा नाना चव्हाण हा देखील इंग्रजांना जाऊन मिळाला. या दोघांनी फितुरी करून उमाजींची माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरेली गावात उमाजींना पकडण्यात आले. उमाजींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. ३ फेब्रुवारी १८३२ ला उमाजींना फाशी देण्यात आली. देशासाठी फासावर जाणारा उमाजी हा पहिला क्रांतिकारक ठरला. फासावर चढण्यापूर्वी उमाजींचे शेवटचे शब्द होते शिवाजी महाराज की जय! वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी देशासाठी हसत हसत फासावर चढणारा हा क्रांतिकारक भारताच्या इतिहासातील पहिला क्रांतिकारक ठरला म्हणून त्यांना आद्यक्रांतिकारक असे म्हणतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढे अनेक क्रांतिकारक देशात निर्माण झाले मात्र दुर्दैवाने या महान क्रांतिकारकाने केलेली क्रांती आजही खूप कमी लोकांना माहीत आहे म्हणूनच आज त्यांच्या जयंतीदिनी सर्वांनी त्यांच्या कार्याची ओळख नवीन पिढीला करुन द्यावी. आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५