टीम, जीवनदीप वार्ता 29/07/2024 क्रीडा
टी२० वर्ल्डकप विजयात अष्टपैलू योगदान देणाऱ्या हार्दिक पंड्यासाठी गेले सहा महिने रोलरकोस्टर राईडप्रमाणे राहिले आहेत. गुरुवारी हार्दिकने घटस्फोटासंदर्भात घोषणा केली. आमच्यासाठी हा कठीण निर्णय होता असं हार्दिकने पोस्टमध्ये लिहिलं. मुलाच्या संगोपनासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध असू असंही हार्दिकने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच वर्ल्डकपविजेता ठरलेला हार्दिक वैयक्तिक आयुष्यात कठीण कालखंडातून जात आहे. गेल्या सहा महिन्यात हार्दिकच्या कारकीर्दीत घडलेल्या घटनांचा घेतलेला आढावा.
वनडे वर्ल्डकपमध्ये दुखापतग्रस्त, उर्वरित सामन्यांना मुकला
गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध पुणे इथल्या सामन्यात लिट्टन दासने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह रोखण्याच्या प्रयत्नात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्याला स्ट्रेचरवरून उपचारासाठी न्यावं लागलं होतं. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हार्दिक त्या सामन्यात खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याने तो उर्वरित वर्ल्डकपचे सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. भारतीय संघासाठी तो मोठा धक्का होता. कारण हार्दिकच्या समावेशामुळे संघव्यवस्थापनाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज खेळवता येत होता. हार्दिक स्पर्धेबाहेर गेल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. ७ सामन्यात २४ विकेट्स घेत शमी स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज ठरला.