team jeevandeep 17/12/2024 क्रीडा
भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशने नुकत्याच झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद जिंकत सर्वात तरूण विश्वविजेता ठरण्याचा मान पटकावला. गेल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये त्याने चिनी ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव केला. बुद्धिबळमध्ये विश्वविजेता ठरल्यानंतर डी गुकेशने अजून एक विजय मिळवला आणि तो म्हणजे त्याच्या भितीवर. डी गुकेशला उंचीची भिती आहे, पण आपल्या कोचला दिलेल्या वचनानंतर त्याने ही कामगिरीही फत्ते केली.
डी गुकेशने सिंगापूरमधील विजयानंतर तेथील स्कायपार्क सेंटोसामध्ये बंजी जंपिंग केली आहे. या बंजी जंपिंगचा व्हीडिओ त्याने स्वत: शेअर केला आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो या बंजी जंपिंगचा थरारक अनुभव घेताना दिसत आहे.
१८ वर्षीय गुकेशने डिंग लिरेनसारख्या विश्वविजेत्या खेळाडूला पराभूत करून विजेतेपद मिळवले. उंचीची भिती वाटत असलेल्या गुकेशने बंजी जंपिंग कशी काय केली असा प्रश्न पडला असेल तर यामागे रंजक कहाणी आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमधील ९व्या डावानंतर विश्रांतीच्या दिवशी गुकेश आणि त्याचे प्रशिक्षक पोलिश ग्रँडमास्टर ग्रेगोर्ज गजेवस्की समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत होते. त्याचदरम्यान त्याच्या कोचने काही जणांना बंजी जंपिंग करताना पाहिलं होतं.
कोच ग्रेगोर्ज गजेवस्की यांनी गुकेशला सांगितले होते की तू जर डिंग लिरेनला पराभूत करत विश्वविजेता ठरलास तर मी बंजी जंपिंग करेन आणि त्यादरम्यान उंचीची भिती असतानाही का काय माहित पण डी गुकेशनेही त्यांना विश्वविजेता ठरल्यास मी देखील बंजी जंपिंग असे त्यांना वचन दिले होते, असं गुकेश विजयानंतर म्हणाला. ज्याचा व्हीडिओ समोर आला होता. ज्यात तो शेवटी मजेत असंही म्हणाला त्याचे माईंड ट्रेनर पॅडी उपटनही त्यांच्याबरोबर तिथे असतील.
गुकेश वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत, गजेव्स्की देखील बंजी जंपिंगबद्दल बोलताना दिसले. बंजी जंप करणं हे आमचं सिकरेट होतं आणि आम्ही बंजी जंपिंग असं दिसतंय. मी बंजी जंपिंग टाळता यावं यासाठी काहीतरी मार्ग शोधत होतो, परंतु त्याने दिलेला शब्द तो पूर्ण करण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी सबब शोधत होतो, पण तो मात्र कधीच सबब न शोधता एखादी गोष्ट पूर्ण करण्यावर त्याचा भर असतो. आता त्याला बंजी जंपिंग करायची आहे, मग मलाही करावी लागेल,” गजेव्स्कीने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.